रस्ते की मृत्यूचे सापळे? विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ; भाजपचा आंदोलनाचा इशारा
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी :
विकासाच्या नावाखाली पाचोरा–भडगाव तालुक्यात सुरू असलेली काँक्रिटीकरण व डांबरीकरणाची रस्ते कामे नागरिकांसाठी दिलासा ठरण्याऐवजी धोक्याचे सापळे बनत चालली आहेत. अल्पावधीतच उखडणारे रस्ते, मोठमोठे खड्डे आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याने सामान्य नागरिकांच्या जीवाशी उघडपणे खेळ सुरू असल्याची तीव्र भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
पाचोरा तालुक्यातील आखतवाडे ते नेरी-वडगाव हा रस्ता याचे जिवंत उदाहरण ठरत असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक तसेच रुग्णवाहिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नुकतेच पूर्ण झालेल्या रस्त्यांची काही दिवसांतच झालेली दयनीय अवस्था पाहता “विकास कोणासाठी?” असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असताना, काही बोगस व भ्रष्ट कंत्राटदारांकडून जाणूनबुजून निकृष्ट कामे करून विकास प्रक्रियेलाच काळिमा फासला जात असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष गोविंद शेलार यांनी केला. करदात्यांच्या पैशातून होणारी ही कामे दर्जेदार नसतील, तर त्याची जबाबदारी निश्चित कोणाची, असा थेट सवाल त्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून, संबंधित कंत्राटदारांवर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“रस्ता म्हणजे फक्त डांबर नव्हे, तो माणसाच्या जीवनाशी जोडलेला असतो. रस्त्यांची अवस्था खराब असल्याने अपघात, आर्थिक नुकसान आणि जीवितहानीचा धोका वाढला आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या विकास कामांचा दर्जा राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून दर्जेदार व टिकाऊ रस्ते निर्माण करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे. अन्यथा, पाचोरा तालुक्यात रस्त्यांबाबत मोठ्या जनआंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.
✍️ प्रतिनिधी
पाचोरा | सत्य शोध न्यूज चॅनल
Comments
Post a Comment