"मोंढाळे शाळेत बाल आनंद मेळावा—विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला मिळाले नवे पंख”
✍️ राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
ग्रामीण प्रतिनिधी : मोंढाळे (ता. पाचोरा)
मोंढाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित या अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या बाल आनंद मेळाव्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवर्ग तसेच समस्त पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध खाद्यपदार्थांचे व लहान वस्तूंचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेले पदार्थ व हस्तकला वस्तू खरेदी करण्यासाठी पालक व उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वस्तू खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव, व्यवहार कौशल्य, संवाद कौशल्य व आर्थिक शिस्त याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले. पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत व्यवहारात सहभागी केल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढताना दिसून आला. काही विद्यार्थ्यांनी विक्री, सुट्टे पैसे देणे व ग्राहकांशी संवाद साधणे यामध्ये कौशल्य दाखवत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मेळाव्यातील आनंदमय वातावरणामुळे शाळेचा परिसर उत्सवमय झाला होता. सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली, असे मत पालकांनी व्यक्त केले.
या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. व्यंकट बोरसे, पदवीधर शिक्षक श्री. राजेंद्र कोळी, श्री. रविंद्र कुंभार तसेच उपक्रमशील उपशिक्षिका श्रीमती मीना नेहरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापकांनी उपस्थित मान्यवर, पालक व सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असे मत व्यक्त केले.
Comments
Post a Comment