कै. पि. के. शिंदे विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप; ‘उंच भरारीसाठी बळकट पंख दिले’ – प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे*
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी :
गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पुनगाव रोड येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावनिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. शालेय जीवनातील आठवणी, मैत्रीचे बंध आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने यांचा सुंदर संगम या समारंभात अनुभवायला मिळाला.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष नीरजजी मुनोत, प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, मुख्याध्यापक जी. व्ही. सोमवंशी, पर्यवेक्षक व्ही. पी. देशमुख तसेच राजेश धोबी सर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी भैरवी पाटील व सेजल राठोड यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी शैलीत केले.
यावेळी कृतिका देशमुख, समृद्धी येवले, गीता बोरसे, जिज्ञासा सपकाळ, समीक्षा चौधरी, प्रीतम पाटील, गौरांग पाटील, खुशी कोळी, अयोध्या मिस्त्री, श्रावणी चिंचोरे, श्रुती राजपूत, पल्लवी सोनार, भूमिका कुंभार आणि जानवी इंगळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील अविस्मरणीय आठवणी, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व मित्रमैत्रिणींसोबतचे अनुभव भावनिक शब्दांत मांडले. अनेक वेळा सभागृहात भारावलेले वातावरण निर्माण झाले.
यावेळी सौ. विद्या कोतकर, श्रीमती एस. एस. ताड आणि श्री. एस. एच. मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्त, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास या यशाच्या तीन महत्त्वाच्या गुरुकिल्ल्या असल्याचे अधोरेखित केले.
समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की,
“शाळेने तुम्हाला बळकट पंख दिले आहेत. त्या पंखांवर विश्वास ठेवा आणि जीवनाच्या आकाशात उंच भरारी घ्या.”
त्यांच्या या शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी दिया मोरे हिने प्रभावी शब्दांत आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकवृंद व शाळा प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी टप्पा ठरला.
Comments
Post a Comment