कलेच्या प्रवासाला मिळाले व्यासपीठ : ‘प्रवास कलेचा’ चित्रप्रदर्शनातून नवोदित कलाकारांचा आत्मविश्वास उजागर
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा येथील स्व. दादासाहेब अनिल देशमुख चित्रकला महाविद्यालयात ‘प्रवास कलेचा’ या आशयगर्भ शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेले चित्रप्रदर्शन हे केवळ कलाकृतींचे सादरीकरण न राहता, विद्यार्थ्यांच्या सर्जनशील प्रवासाचे दर्शन घडवणारे महत्त्वपूर्ण कलाव्यासपीठ ठरले. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कलाशिक्षक श्री. अरुण नारायण सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ शिल्पकार व चित्रकार श्री. आप्पासो निरंजन भास्कर शेलार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी अलंकारिक शैलीचे भीष्मपितामह मानले जाणारे ज्येष्ठ चित्रकार श्री. श्याम कुमावत, निवृत्त ज्येष्ठ कलाशिक्षक श्री. एल. झेड. कोल्हे, त्रिमूर्ती आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सुशीलकुमार चौधरी, महात्मा फुले हायस्कूलचे कलाशिक्षक श्री. चैतन्य नवगीरे, पी.एन.जी. आर्ट गॅलरीचे व्यवस्थापक श्री. गिरीश ढेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संदीप पाटील यांनी ‘प्रवास कलेचा’ या संकल्पनेमागील भूमिका विशद करताना, कला ही केवळ अभिव्यक्ती नसून ती समाजभान जपणारी साधना असल्याचे प्रतिपादन केले. या प्रदर्शनात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रमोद पाटील, सागर मोरे, राहुल सोनवणे, निलेश महाजन तसेच जामनेर आर्ट अकॅडमीचे संचालक निलेश कुवर यांच्या कलाकृतींसह ए.टी.डी. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या चित्र, रेखाचित्रे व सर्जनशील कलाकृती मांडण्यात आल्या आहेत.
मार्गदर्शनपर भाषणात श्री. कोल्हे सर व श्री. आप्पासो शेलार यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि तांत्रिक कौशल्याचे भरभरून कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात श्री. सपकाळे यांनी कला शिक्षणाच्या बदलत्या परिमाणांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी, सातत्य आणि शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिशा ठाकूर हिने प्रभावीपणे केले. विद्यार्थी मनोगत भूमी पाटील व गुणवंती पाटील यांनी व्यक्त करत प्रदर्शनामागील अनुभव कथन केला. आभार प्रदर्शन योगिता पाटील हिने केले. या चित्रप्रदर्शनास शहरातील कलाप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
एकूणच ‘प्रवास कलेचा’ हे चित्रप्रदर्शन नवोदित कलाकारांसाठी आत्मविश्वास वाढवणारे, तर कलाप्रेमींसाठी सर्जनशील आनंद देणारे ठरले आहे.
Comments
Post a Comment