शिक्षक म्हणजे राष्ट्रनिर्माते – लोकमत EXCELLENT TEACHERS AWARD-2025 सोहळ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिपादन
राजेंद्र खैरनार सत्य शोध न्यूज चॅनल
जळगाव | प्रतिनिधी :
लोकमत समूहाच्या वतीने जळगाव येथे आयोजित जळगाव व धुळे जिल्ह्यातील कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान सोहळा – लोकमत EXCELLENT TEACHERS AWARD-2025 हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता समाजाला सकारात्मक दिशा देणारी ऊर्जा देणारा सोहळा ठरला.
या गौरवशाली कार्यक्रमाला माननीय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली. आमदार पाटील यांच्या हस्ते विविध विषयांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना, “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून तो भावी पिढी घडवणारा राष्ट्रनिर्माता आहे,” असे ठाम मत व्यक्त केले.
शिक्षकांनी काळानुरूप बदल स्वीकारत गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना आमदार पाटील यांनी अशा उपक्रमांसाठी लोकमत परिवाराचे विशेष कौतुक केले.
या सन्मान सोहळ्यास जळगाव लोकसभा खासदार स्मिताताई वाघ, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे, जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे डीन ठाकूर साहेब, लोकमतचे संपादक अग्रवाल साहेब यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. जळगाव व धुळे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षकवर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित होता.
लोकमत परिवाराने आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर शिक्षकांच्या कार्याला नवी प्रेरणा देणारा आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांतून व्यक्त होत होती.
Comments
Post a Comment