शिक्षण उत्सव २०२६ अंतर्गत चर्चासत्रात गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांचा सक्रिय सहभाग
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
जळगाव | प्रतिनिधी
जिल्हा परिषद जळगाव व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील निवडक शंभर अधिकारी व शिक्षकांना सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते.
या निमित्ताने आयोजित शैक्षणिक चर्चासत्रासाठी पाचोरा येथील गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांची निवड करण्यात आली. सदर चर्चासत्रात भुसावळ गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, डायटचे अधिव्याख्याता चंद्रकांत साळुंखे यांच्यासह जिल्ह्यातील विविध शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
चर्चासत्रात गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी गुणवत्तापूर्ण शाळा भेटी कशा प्रभावीपणे घ्याव्यात, तसेच निपुण महाराष्ट्र अभियान राबविताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर व अभ्यासपूर्ण भूमिका मांडली. याशिवाय शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध आधुनिक मार्ग, संभाव्य धोके व घ्यावयाची काळजी या विषयांवर गटकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आपले विचार मांडले.
या चर्चासत्रात पाचोरा तालुक्यातील केंद्रप्रमुख जितेंद्र पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी, शिक्षिका रजनी पाटील, स्मृती साबळे, तसेच शिक्षक रवींद्र कुंभार यांनीही सहभाग घेतला.
शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ घडवून आणण्यासाठी असे उपक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरत असून, शिक्षण उत्सव २०२६ हे जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment