‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांचा राष्ट्रस्वर; प्रा. जयश्री वर्मा–वाघ यांच्या गायनाने पाचोरा भारावला...!
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य
शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
स्वातंत्र्य, त्याग आणि राष्ट्रप्रेमाचा इतिहास ज्या गीतात सामावलेला आहे, त्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रस्वराच्या १५० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा साक्षीदार पाचोरा शहर ठरला. श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रा. जयश्री वर्मा–वाघ मॅडम यांच्या भावस्पर्शी गायनाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.
प्रा. वर्मा–वाघ मॅडम यांच्या सुमधुर आवाजातून उमटलेल्या प्रत्येक सुरात मातृभूमीवरील निस्सीम प्रेम, स्वातंत्र्यलढ्यातील त्याग आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रकर्षाने जाणवत होता. ‘वंदे मातरम्’ हे केवळ गीत नसून राष्ट्राची चेतना आहे, याची प्रचीती त्यांच्या सादरीकरणातून उपस्थितांना आली.
कार्यक्रमादरम्यान निर्माण झालेले राष्ट्रभक्तीचे वातावरण, टाळ्यांचा कडकडाट आणि प्रेक्षकांच्या भावविवश प्रतिक्रिया या सादरीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ठरल्या. विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांनी या गायनाचे विशेष कौतुक करत हा क्षण अविस्मरणीय ठरल्याची भावना व्यक्त केली.
१५० वर्षांचा इतिहास लाभलेल्या ‘वंदे मातरम्’ला पाचोर्यात लाभलेली ही स्वरांजली केवळ सांस्कृतिक कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता, राष्ट्रप्रेम जागवणारा प्रेरणादायी संदेश देऊन गेली.
Comments
Post a Comment