सर्वसामान्य कार्यकर्ता ते लोकाभिमुख नगरसेवक : कोंडवाडा गल्ली, देशपांडे वाडा व जामनेर रोड येथे स्वच्छतेतून संदीप (राजे) पाटील यांच्या ‘काम बोलते’ राजकारणाची ठळक छाप
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
राजकारण म्हणजे पदाची प्रतिष्ठा नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांशी नाळ जोडून केलेली प्रामाणिक सेवा—हे कृतीतून सिद्ध करणारे नेतृत्व म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक संदीप (राजे) रामदास पाटील. प्रभाग क्रमांक १२ मधील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून लोकाभिमुख नगरसेवकपदापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षमय असला, तरी तो तितकाच प्रेरणादायी ठरला आहे.
कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार आप्पा पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संदीप पाटील यांनी दीर्घकाळ सामाजिक, संघटनात्मक व लोकहिताच्या कार्यातून जनतेशी घट्ट नाते निर्माण केले. त्यांच्या सातत्यपूर्ण व प्रामाणिक कार्याची दखल घेत, रहिवाशांच्या आग्रहातून त्यांनी सन २०२५ च्या नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला. जनतेच्या प्रचंड विश्वासाच्या बळावर त्यांनी घवघवीत मतांनी दणदणीत विजय मिळवला.
निवडीनंतर पदाचा मान मिरवण्याऐवजी त्यांनी तात्काळ कामाला सुरुवात केली. प्रभागातील आरोग्यविषयक प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देत स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन, पाणी साठ्यांची स्वच्छता तसेच डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
आज मंगळवार, जानेवारी २०२६ रोजी प्रभाग क्रमांक १२ मधील कोंडवाडा गल्ली, देशपांडे वाडा व जामनेर रोड परिसरात नाली व गटारांची सखोल साफसफाई प्रत्यक्ष राबवून नगरसेवक संदीप (राजे) पाटील यांनी ‘काम बोलते’ या आपल्या राजकारणाची ठळक प्रचिती दिली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
“लोकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे,” असे ठामपणे सांगत नगरसेवक संदीप (राजे) पाटील यांनी विकास, आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी अखंडपणे कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये सकारात्मक बदलांची स्पष्ट लक्षणे दिसू लागली असून, नव्या पिढीतील लोकप्रतिनिधींसाठी हा प्रवास आदर्श व दिशादर्शक ठरत आहे.
Comments
Post a Comment