नायलॉन मांजा म्हणजे जीवघेणा शस्त्र; वापर केला तर ‘खूनाचा प्रयत्न’ ठरवणार...!
राजेंद्र खैरनार सत्य मुख्य संपादक शोध न्युज चॅनल
जळगाव | प्रतिनिधी :
नायलॉन अथवा सिंथेटिक मांज ही केवळ पतंग उडविण्याची साधन नसून ती माणसाच्या, पशुपक्ष्यांच्या आणि पर्यावरणाच्या जीवावर उठलेली अदृश्य तलवार आहे, अशी ठाम भूमिका जळगाव पोलिस प्रशासनाने घेतली आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचा वापर, विक्री किंवा साठवणूक केल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ हा गंभीर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
नायलॉन मांजामुळे घशावर, हातापायांवर गंभीर जखमा होऊन अनेक निष्पाप नागरिक, दुचाकीस्वार व पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून यंदा पोलिसांनी कोणतीही तडजोड न करण्याचा निर्धार केला आहे. दोषी आढळणाऱ्यांवर अजामिनपात्र गुन्हा दाखल होणार असून दहा वर्षांपर्यंत कारावास व मोठा आर्थिक दंड भोगावा लागणार आहे.
जिल्हाभरात विशेष पोलिस पथके तैनात करण्यात आली असून पतंग विक्री केंद्रे, गोदामे व संशयित ठिकाणी तपासणी सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर थेट कारवाई केली जात असून पर्यावरण संरक्षण कायद्यानुसारही गुन्हे दाखल केले जात आहेत.
पोलिस प्रशासनाने पालकांना कडक आवाहन करताना सांगितले आहे की, मुलांच्या हातात नायलॉन मांज देणे म्हणजे त्यांना आणि इतरांना मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखे आहे. सुरक्षित, पर्यावरणपूरक सूत वापरणे हीच खरी उत्सवाची ओळख असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर कुठेही आढळल्यास नागरिकांनी ११२ क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे.
नायलॉन मांजाविरोधातील ही कारवाई इशारा नसून थेट कृतीची सुरुवात आहे, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.
Comments
Post a Comment