पाचोरा नगरपरिषदेत सत्तास्थैर्याचा संदेश; उपाध्यक्ष व तीन नामनिर्देशित सदस्य बिनविरोध
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी | दि. १२ जानेवारी २०२६
पाचोरा नगरपरिषदेत आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष पदासह तीन नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या बिनविरोध झाल्याने शहराच्या राजकारणात सत्तास्थैर्याचा स्पष्ट संदेश मिळाला आहे. नगरपरिषदेच्या प्रशासनिक व राजकीय पातळीवर समन्वय साधत पार पडलेली ही निवड प्रक्रिया विशेष लक्षवेधी ठरली.
उपाध्यक्ष पदासाठी आज सकाळी ११ वाजेपर्यंत नामांकन दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. विहित वेळेत केवळ श्री. किशोर गुणवंत बारवकर यांचेच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची पाचोरा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
तसेच नगरपरिषदेतील तीन नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी सत्ताधारी शिवसेना गटाकडून दोन प्रस्ताव सादर करण्यात आले. शिवसेना गटनेते श्री. सुमित किशोर पाटील यांच्या शिफारसीनुसार ॲड. श्री. योगेश जगन्नाथ पाटील व श्री. शरद बाळकृष्ण वाणी (पाटे) यांच्या नावांना छाननीअंती मान्यता देण्यात आली.
याच वेळी भाजप गटनेते श्री. सुरज संजय वाघ यांनी शिफारस केलेल्या श्री. अविनाश देविदास सुतार यांच्या नावासही सर्वानुमते मान्यता देण्यात येऊन त्यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या सर्व नियुक्त्यांची अधिकृत घोषणा मा. पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोर पाटील यांनी करत सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय शहरविकासासाठी पूरक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेस नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोर पाटील, मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे, माजी नगराध्यक्ष श्री. संजय गोहिल, उपमुख्याधिकारी श्री. दुर्गेश सोनवणे, कर अधीक्षक श्री. डी. एस. मराठे, तसेच नवनियुक्त उपाध्यक्ष, नामनिर्देशित सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांच्या बिनविरोध नियुक्त्यांमुळे पाचोरा नगरपरिषदेतील प्रशासन अधिक सक्षम होऊन आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment