"बाप से बेटी सवई" …! पाचोऱ्यात ‘बेस्ट स्टुडंट’ची पिढीजात परंपरा; कुलकर्णी कुटुंबाने रचला दुर्मिळ शैक्षणिक इतिहास


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल 

पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा शहराच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद घ्यावी असा एक आगळावेगळा आणि अभिमानास्पद योगायोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “बाप से बेटा सवई” ही म्हण अनेक ठिकाणी ऐकू येते; मात्र पाचोऱ्यातील कुलकर्णी कुटुंबाने ती मोडीत काढत “बाप से बेटी सवई” असा नवा शैक्षणिक आदर्श घालून दिला आहे.
पाचोरा येथील रहिवासी, सर्वांचे परिचित, मितभाषी व मदतीस सदैव तत्पर असलेले विनोद रघुनाथ कुलकर्णी यांनी पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका (SSMM) महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनात त्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे, तर खेळ, नाटक, गायन, मिमिक्री, विविध स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेची दखल घेत सन 1996 मध्ये त्यांना ‘Best Student (Student of the Year)’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा वारसा इथेच थांबला नाही. विनोद कुलकर्णी यांच्या दोन्ही सुकन्या — सिद्धी विनोद कुलकर्णी व धनश्री विनोद कुलकर्णी — यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतच नव्हे, तर त्या पावलांपुढे जाऊन आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
गायन, नृत्य, नाटक, खेळ, चित्रकला, वादविवाद अशा सर्वच उपक्रमांमध्ये या दोघी सातत्याने अग्रेसर राहिल्या.
विशेष म्हणजे, दोन्ही कन्यांनीही पाचोरा कॉलेजमधूनच आपले शिक्षण पूर्ण करून कॉलेजच्या लौकिकात भर घातली.
सिद्धी विनोद कुलकर्णी हिला सन 2023 चा ‘Best Student Award’,
तर धनश्री विनोद कुलकर्णी हिला सन 2026 चा ‘Best Student Award’
मिळाल्याने एका कुटुंबात तीन पिढ्यांत ‘Best Student Award’ मिळण्याचा दुर्मिळ विक्रम साकार झाला आहे.
आजवर केवळ पाचोरा कॉलेजच नव्हे, तर एकूणच शैक्षणिक क्षेत्रात असा योगायोग क्वचितच पाहायला मिळतो. या अभूतपूर्व यशामुळे पाचोरा शहरात सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, कुलकर्णी कुटुंब हे संस्कार, गुणवत्ता व सर्वांगीण शिक्षणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद