आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकाराने पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणात मोठा निर्णय; सात मागण्या मान्य, वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरु
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यात सन २०१९ पासून सुरू असलेल्या शेतकरी अनुदान, अतिवृष्टी व विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वितरणातील कथित गैरप्रकारांमुळे शेतकरी वर्गात दीर्घकाळापासून तीव्र असंतोष निर्माण झाला होता. पात्र असूनही अनुदान न मिळणे, काही प्रकरणांत रक्कम चुकीच्या खात्यावर वर्ग होणे, तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. अनेक निवेदने, पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष न्याय मिळत नसल्याने हा प्रश्न गंभीर बनला होता.
सन २०१९ पासून अतिवृष्टी, पूरस्थिती, पीक नुकसान, घरांचे व मालमत्तेचे नुकसान याबाबत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वितरणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे प्रकार समोर आले. अधिकृत सरकारी यादीत नाव असलेल्या अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही, तर काही ठिकाणी अपात्र किंवा चुकीच्या खात्यांवर रक्कम जमा झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी गुन्हे दाखल होऊन न्यायालयात चार्जशीट सादर करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत गेली.
याच पार्श्वभूमीवर नाचणखेडा येथील शेतकरी गुलाब प्रताप पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आमरण उपोषण सुरू केले. सन २०१९ पासून पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्याच्या खात्यावर प्रत्यक्ष अनुदान जमा होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. दिवसा प्रशासनाकडून चर्चा सुरू असतानाही रात्री अंधारात उपोषण सुरू ठेवण्यात आले, यामुळे आंदोलनाची तीव्रता अधोरेखित झाली.
या आंदोलनात शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणातील प्रमुख आंदोलक संदीप दामोदर महाजन यांनी सक्रिय भूमिका बजावली. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून शुद्ध शेतकरी न्यायासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा, लाक्षणिक आंदोलने आणि शेतकऱ्यांचे संघटन या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करण्यात आला.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी गुलाब प्रताप पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बाब लक्षात येताच पाचोरा नगरपालिकेचे शिक्षण सभापती व नगरसेवक प्रवीण ब्राह्मणे यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून तातडीने उपोषणस्थळी भेट दिली.
प्रांताधिकारी भूषण अहिरे कार्यालयात उपस्थित नसल्याने आमदारांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली व आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर तहसीलदार पाचोरा विजय बनसोडे यांना आवश्यक कागदपत्रांसह उपोषणस्थळी बोलावण्यात आले.
उपोषणस्थळी झालेल्या बैठकीस शेतकरी गुलाब प्रताप पाटील, संदीप महाजन, सामाजिक कार्यकर्ते शिवरामदादा, उबाठा सेनेचे रमेश बाफना, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशबापू पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाप्रमुख सचिन सूर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे, माजी सैनिक किरण पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सखोल साधक-बाधक चर्चा झाल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते नारळपाणी देऊन गुलाब प्रताप पाटील यांचे आमरण उपोषण सोडवण्यात आले. या चर्चेअंती शेतकऱ्यांच्या सातही मागण्या पूर्णतः मान्य करण्यात आल्या.
या निर्णयानुसार सन २०१९ ते आजपर्यंत अनुदानासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांची गावनिहाय व वर्षनिहाय सविस्तर यादी पीडीएफ स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी महसूल विभागाच्या अखत्यारीतील मुक्ताईनगर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली असून, या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
चुकीच्या खात्यावर गेलेल्या रकमा, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे, तसेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर प्रत्यक्ष अनुदान जमा होईपर्यंत कार्यवाही सुरू ठेवण्याचा निर्धार प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई, पारदर्शक चौकशी व शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळावा यासाठी वरिष्ठ स्तरावर सतत देखरेख ठेवली जाणार आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या निर्णायक हस्तक्षेपामुळे हा प्रश्न मार्गी लागला असला, तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईपर्यंत प्रशासनाची जबाबदारी संपत नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे. त्यामुळे पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या निर्णयांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागले आहे.
Comments
Post a Comment