स्त्री शिक्षणाच्या क्रांतीचा दीपस्तंभ सावित्रीबाई फुले; समाजसुधारणेचा प्रेरणास्रोत – प्रा. ज्योती ननवरे
राजेंद्र खैरनार सत्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
भडगाव | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कविमनाच्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत, स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनतो. “शिक्षण हा स्त्रीचा सर्वोत्तम दागिना असून सावित्रीबाई फुले या स्त्रीमुक्ती चळवळीच्या जननी आहेत,” असे अभ्यासपूर्ण विचार प्रा. ज्योती सुखदेव ननवरे यांनी व्यक्त केले.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सु. गी. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, भडगाव येथे राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती सी. व्ही. बिऱ्हाडे होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्षांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए. बी. अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ कला उपशिक्षक श्री सी. एस. पाटील यांनी उत्कृष्ट फलकलेखन साकारले.
प्रा. ज्योती ननवरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्रांतीच्या कार्याचा इतिहास उदाहरणांसह विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. तसेच स्त्रीमुक्ती आंदोलनाची गंगोत्री असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्रा. डॉ. प्राजक्ता देशमुख यांचा SET परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत “शाळेतील संस्कारांमुळेच आम्ही यशस्वी होऊ शकलो,” असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमानिमित्त निबंध, वक्तृत्व, वेशभूषा स्पर्धा तसेच “मी सावित्री बोलतेय” हे एकपात्री नाटक सादर करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात श्रीमती सी. व्ही. बिऱ्हाडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या त्यागमय जीवनकार्याची प्रेरणादायी माहिती दिली.
स्त्रियांच्या उन्नतीसाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस मुलींना प्रेरणा मिळावी म्हणून “बालिका दिन” म्हणून साजरा केला जातो. या निमित्त विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासोबत राजगिऱ्याचे लाडू वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी व अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन श्रीमती पूजा जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री डी. बी. नागरे यांनी मानले.
या कार्यक्रमास पर्यवेक्षिका श्रीमती सी. व्ही. बिऱ्हाडे, दुपार सत्राचे पर्यवेक्षक एस. एस. महाजन, ज्येष्ठ शिक्षक ए. बी. तायडे, एन. के. सोनजे, एस. पी. सोनवणे, प्रा. रेखा कोसोदे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एम. एन. देशमुख, श्री डी. पी. पाटील, उपशिक्षिका श्रीमती व्ही. यू. जाधव, पी. एस. देशमुख, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून;
तिचा साठा ज्यापाशी, ज्ञानी ते मानती जन…”
— क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
Comments
Post a Comment