शाळा म्हणजे सुरक्षित किल्ला; प्रशासनाचे कडक आदेश, शिस्तबद्ध बंदोबस्ताचे निर्देश


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल

पाचोरा प्रतिनिधी:
भडगाव तालुक्यातील आदर्श कन्या विद्यालयात नर्सरीच्या दोन चिमुकल्यांचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर शालेय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पाचोरा मा. विजय शिवाजी बनसोडे यांनी तालुक्यातील सर्व शाळांसाठी शिस्तबद्ध व सक्त बंदोबस्ताचे स्पष्ट आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार पाचोरा तालुक्यातील सर्व पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळांची तात्काळ पाहणी करून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या सर्व बाबी शोधून काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा परिसरात असलेले नाले, विहिरी, पाण्याच्या टाक्या, उघडे विद्युत पोल, अपूर्ण संरक्षक भिंती याठिकाणी कोणत्याही परिस्थितीत दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी संरक्षण भिंत, कंपाउंड, जाळी आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी पहारेकरी नेमणे तसेच सी.सी.टी.व्ही. कॅमेरे कार्यान्वित ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. विशेषतः लहान विद्यार्थ्यांच्या हालचाली, खेळ व स्वच्छतागृह वापराच्या वेळी अधिक दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. शाळा परिसरात कोणतीही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
विद्यार्थी शाळेत ये-जा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांबाबतही प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांची पूर्तता केल्याशिवाय शालेय वाहने वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच वाहनचालक व वाहकांची चारित्र्य पडताळणी करूनच त्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद