पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा;लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता ताई पाटील यांचा भव्य पदग्रहण सोहळा
(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवत लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता ताई पाटील यांच्या पदग्रहणाचा भव्य व ऐतिहासिक सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यामुळे पाचोरा शहराच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला.
या कार्यक्रमास राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील, पाचोरा–भडगावचे आमदार आदरणीय किशोर आप्पा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख ललिता ताई पाटील, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, गटनेते सुमित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत जनतेच्या विश्वासावर ऐतिहासिक विजय मिळवला. विविध पक्ष एकत्र येऊनही आमदार किशोर आप्पा पाटील यांना रोखण्यात अपयशी ठरले. शिवसेनेला नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळाल्याने शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
यावेळी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले,
“हा विजय दादागिरीचा किंवा सत्तेच्या मस्तीचा नाही, तर विकास, विश्वास आणि शांततेचा विजय आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक नगरसेवकाने अशी कामगिरी करावी की पुढील निवडणुकीत जनता स्वतः त्याच नगरसेवकाची मागणी करेल.”
महिला सक्षमीकरणावर भर देत त्यांनी महिला बचत गटांसाठी ‘ऊर्जा दीदी’ सौरऊर्जा प्रकल्पाची माहिती दिली.
लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीता ताई पाटील यांनी आपल्या भाषणात महिलांचा या विजयातील निर्णायक वाटा अधोरेखित केला.
“या विजयात ८० टक्के योगदान महिलांचे आहे,” असे सांगत त्यांनी पाचोरा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
“पाचोरा शहराला पाणी देणारी नगराध्यक्ष म्हणून ओळख निर्माण करेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या विजयाचे अभिनंदन करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना विकासासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. राज्य शासनाच्या माध्यमातून पाचोरा शहरासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात महिला बचत गटांसाठी सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार, आर्थिक स्वावलंबन, बँक कर्ज, अनुदान आणि प्रत्यक्ष कामाच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या भव्य पदग्रहण सोहळ्यास मोठ्या संख्येने माता-भगिनी, शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. शिवसेनेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून, पाचोरावासीयांमध्ये नव्या विकास पर्वाची अपेक्षा निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment