स्वच्छता अभियान पंधरवड्याआधी त्र्यंबक नगरमधील जाम नालीचा प्रश्न मार्गी; नाली सफाईसोबत फवारणीही सुरू, हळूहळू पाचोरा शहराची सर्व साफसफाई करणार — आरोग्य सभापती सतीश आबा चेडे
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक
सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
स्वच्छता अभियान पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर पाचोरा नगरपालिकेने केवळ कागदी नियोजन न करता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली असून, त्र्यंबक नगर परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला जाम नालीचा प्रश्न अखेर मार्गी लावण्यात आला आहे. नाली सफाईसोबतच आज त्या परिसरात मोठ्या प्रमाणात फवारणीही करण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
त्र्यंबक नगर परिसरात नालीला तडे जाऊन गाळ, कचरा व सांडपाणी साचल्याने निचरा पूर्णतः बंद झाला होता. परिणामी दुर्गंधी, डासांचे वाढते प्रमाण व साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला होता. नागरिकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पाचोरा नगरपालिकेने तात्काळ नाली दुरुस्ती करून साचलेला गाळ व घाण काढून निचरा सुरळीत केला. यासोबतच ज्या ठिकाणी झाडझुडपे वाढली होती, त्या ठिकाणी साफसफाई करत आज औषधी फवारणीही करण्यात आली.
नाली सफाई, झाडझुडपांची कटिंग व फवारणी अशा एकत्रित कार्यवाहीमुळे परिसरातील दुर्गंधी कमी झाली असून डास व किटकजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
ही संपूर्ण कार्यवाही नगराध्यक्षा सुनिता ताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर आप्पा बारवकर, शिवसेना गटनेते सुमित पाटील तसेच मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आरोग्य सभापती सतीश आबा चेडे यांच्या आदेशानुसार व ते स्व:ता ही आरोग्य विभागाचे कर्मचारींवर प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून नाली सफाई व फवारणीच्या कामावर लक्ष ठेवून होते.
यावेळी बोलताना आरोग्य सभापती सतीश आबा चेडे यांनी ठामपणे सांगितले की, “त्र्यंबक नगरमधील ही कारवाई केवळ सुरुवात आहे. पुढील टप्प्यात पाचोरा शहरातील सर्व १४ वार्डांमध्ये टप्प्याटप्प्याने नाली सफाई, झाडझुडपांची साफसफाई व नियमित फवारणी करण्यात येणार आहे. हळूहळू पण प्रभावीपणे संपूर्ण पाचोरा शहर स्वच्छ व निरोगी करण्याचा आमचा संकल्प आहे.”
स्वच्छता अभियान पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन अधिक सक्रिय झाले असून, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, कचरा व सांडपाणी नाल्यांमध्ये टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्र्यंबक नगरमध्ये झालेल्या एकत्रित व तत्पर कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ही मोहीम संपूर्ण पाचोरा शहरासाठी दिशादर्शक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment