चुंबकीय शक्तीचा विज्ञाननिष्ठ वेध; कोळगाव महाविद्यालयात मानवी आरोग्यावर मॅग्नेटिक प्रभावांचा उलगडा
राजेंद्र खैरनार राजेंद्र मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
कोळगाव | प्रतिनिधी
विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून मानवी आरोग्याशीही थेट जोडलेले आहे, याचा प्रत्यय कोळगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालयात आला. प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने “चुंबकीय पदार्थ व त्याचे मानवी शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम” या विषयावर आयोजित शिबिरात चुंबकीय विज्ञानाचा आरोग्यदायी पैलू प्रभावीपणे मांडण्यात आला.
भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा. दिनकर सूर्यवंशी यांनी मानवी शरीरातील सांधे व नसा यांच्या हालचालींमध्ये निर्माण होणारे अवरोध दूर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लघु चुंबकीय यंत्रांची शास्त्रीय मांडणी केली. या उपकरणांमधील चुंबकीय क्षेत्र कसे कार्य करते, तसेच मॅग्नेटिक साधने व विद्युत वाहक यांचा परस्परसंबंध भौतिकशास्त्राच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे, याचे सखोल विश्लेषण त्यांनी केले.
यावेळी चाळीसगाव येथील श्री. बी. एन. पाटील यांनी विविध चुंबकीय उपकरणांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित प्राध्यापक, प्राचार्य व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला. विज्ञान व उपचार यांची सांगड घालणारे हे सादरीकरण उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश आनंदा कोळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गो. पु. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अनिल पवार तसेच पर्यवेक्षिका शिसोदे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप बाविस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मनोज पवार यांनी मानले.
या शिबिरामुळे चुंबकीय विज्ञानाबाबत असलेले गैरसमज दूर होऊन, त्याचा मानवी आरोग्यासाठी असलेला वैज्ञानिक व सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित झाला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment