नगरपरिषदेच्या कारभाराला गती : विषय समित्या व स्थायी समिती गठीत; नव्या सभापतींची निवड


राजेंद्र खैरनार  मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल

पाचोरा | प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या प्रशासकीय व विकासात्मक कारभाराला अधिक प्रभावी दिशा देण्यासाठी आज सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी नगरपरिषदेची विशेष सभा पार पडली. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडील विशेष सभेच्या सूचनेनुसार स्थायी समिती तसेच विविध विषय समित्यांचे सदस्य नामनिर्देशन व सभापती निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
या विशेष सभेत सार्वजनिक बांधकाम, शिक्षण-क्रीडा-संस्कृती, स्वच्छता-वैद्यक-सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा-जलनिस्सारण, नियोजन-विकास तसेच महिला व बालकल्याण अशा महत्त्वाच्या सहा विषय समित्यांची रचना करण्यात आली. प्रत्येक समितीसाठी अनुभवी व लोकप्रतिनिधित्व असलेले सदस्य निवडण्यात आल्याने नगरपरिषदेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी प्रियंका वाल्मिक पाटील, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी प्रविण हरिश्चंद्र ब्राम्हणे, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी सतीष पुंडलिक चेडे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी रहेमान बिस्मिल्ला तडवी, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी किशोर गुणवंत बारवकर तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मिनाक्षी संजय एरंडे यांची निवड करण्यात आली.
तसेच नगरपरिषदेच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असलेल्या स्थायी समितीवर लोकनियुक्त नगराध्यक्षा, सर्व विषय समित्यांचे सभापती व पालिका सदस्यांनी नामनिर्देशित केलेले श्री. गणेश भीमराव पाटील, श्री. संजय नाथालाल गोहिल व श्री. राहुल अंकुश गायकवाड यांची निवड करण्यात आली.
या विशेष सभेचे कामकाज पिठासीन अधिकारी भुषण अहिरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा विभाग यांनी पाहिले. सभेला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनीता किशोर पाटील, उपाध्यक्ष किशोर गुणवंत बारवकर, सर्व नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी मंगेश देवरे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या समित्यांच्या स्थापनेमुळे शहराच्या विकासकामांना चालना मिळून नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत अधिक गतिमान व नियोजनबद्ध निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद