पाचोऱ्याच्या गाळणचा पैलवान थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर; पै. हितेक्ष अनिल पाटीलची सुवर्णझळाळी कामगिरी
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गाळण या छोट्याशा गावचा सुपुत्र पै. हितेक्ष अनिल पाटील याने आपल्या कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्तीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रासह भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. थायलंडमधील बँकॉक येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये १२५ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावत त्याने भारतीय कुस्ती परंपरेत आणखी एक सुवर्णअध्याय लिहिला आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या या होतकरू पैलवानाचा प्रवास संघर्षमय असला, तरी तितकाच प्रेरणादायी ठरला आहे. मर्यादित सुविधा, कठोर सराव आणि अनेक अडचणींवर मात करत पै. हितेक्ष पाटील यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली ताकद सिद्ध केली. स्पर्धेदरम्यान देश-विदेशातील बलाढ्य कुस्तीपटूंना नमवत अंतिम फेरीत त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखले आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
या ऐतिहासिक यशामुळे गाळण गावासह संपूर्ण पाचोरा तालुका, जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रभर अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. पै. हितेक्ष यांच्या यशामागे कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा, प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत निर्णायक ठरली. त्यांच्या विजयाने ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेण्याची नवी उमेद मिळाली आहे.
दरम्यान, या सुवर्णयशानंतर पाचोरा शहरात पै. हितेक्ष अनिल पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी विनोद तावडे नांद्रा, बाळू तात्या वेरूळ, राहुल बेहरे दादा, नगरसेवक सतीश आबा चेडे, मनोज आप्पा गोराडखेडे तसेच कुंदन मोबाईलचे संचालक कुंदन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी पैलवान हितेक्ष पाटील यांचे पुष्पहार व शुभेच्छांनी स्वागत करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
पै. हितेक्ष अनिल पाटील यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, गाळणचा हा पैलवान आता केवळ गावाचा नव्हे, तर भारताचा अभिमान बनला आहे.
Comments
Post a Comment