पाचोऱ्यात इतिहास घडला; प्रभाग ७ मधून प्रवीण–वर्षाताई ब्राह्मणे दाम्पत्याची एकत्रित विजयी बाजी...!
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा नगरपालिकेच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला असून प्रभाग क्रमांक सात मधून श्री. प्रवीण ब्राह्मणे व सौ. वर्षाताई ब्राह्मणे यांनी नगरसेवक व नगरसेविका म्हणून दणदणीत विजय मिळवला आहे. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या आशीर्वादाने व पाठबळाने दोघांनीही निवडणुकीत बाजी मारत पाचोरा शहराच्या इतिहासात प्रथमच पती-पत्नी एकाच प्रभागातून निवडून येण्याचा मान मिळवला आहे.
पाचोरा येथील पत्रकार, सामान्य कार्यकर्ता, तरुणांचा मित्र व सर्वांचा विश्वासू दोस्त म्हणून ओळख असलेले श्री. प्रवीण ब्राह्मणे हे जात-पात न पाहता मैत्री जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी पत्रकार क्षेत्राच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क वाढवत सामाजिक हिताचे कार्य केले. जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचा प्रभावी वापर केला असून अनेक विधायक कामे करून प्रशासन व अधिकाऱ्यांशी सुसंवाद राखत आपली पत्रकारिता प्रामाणिकपणे जपली.
पत्रकारिता हा छंद जपत त्यांनी राजकारणात सक्रिय प्रवेश करत शिवसेना (शिंदे गट) मध्ये, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा निर्धार करत त्यांनी प्रभाग क्रमांक सातमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या माध्यमातून समाजमंदिर उभारणी, समाजोपयोगी विकासकामे, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न अशी विविध कामे राबवली.
तसेच त्या परिसरातील अतिक्रमित घरांची नावे नगरपालिकेत नोंदवून ती नियमित करण्यासाठी प्रयत्न, तसेच नगरपालिकेतील नोकरीपासून वंचित राहिलेल्या तरुणांना कायमस्वरूपी संधी मिळाव्यात यासाठी आमदारांकडे सातत्याने पाठपुरावा करून कामे मार्गी लावली. या सर्व कामांच्या जोरावर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांना जोडीने नगरपालिकेचे तिकीट देत संपूर्ण ताकदीनिशी साथ दिली आणि त्यातून दोघांनाही घवघवीत यश मिळाले.
या ऐतिहासिक विजयामुळे पाचोरा शहरात सर्वत्र त्यांचे स्वागत होत असून विविध सामाजिक, राजकीय व पत्रकार बांधवांकडून त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पती-पत्नींच्या या एकत्रित निवडीमुळे पाचोरा नगरराजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
Comments
Post a Comment