प्रजासत्ताक दिनी विचारांचा रणसंग्राम; प्रा. वसंत हंकारेंचे लोहाऱ्यात जाहीर व्याख्यान
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनेल
लोहारा | प्रतिनिधी अनिल तडवी
पत्रकार दिन व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोहारा शहरात विचारप्रबोधनाचा एक महत्त्वपूर्ण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लोहारा शहर वृत्तपत्र पत्रकार बहुउद्देशीय संस्था व पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध युवा व्याख्याते व समाजप्रबोधनकार प्रा. वसंत हंकारे यांचे जाहीर व्याख्यान सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता जिल्हा परिषद मराठी मुलींच्या (कन्या) शाळेत आयोजित करण्यात आले आहे.
सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक अस्वस्थतेच्या काळात तरुणाईला दिशा देणारे, अन्यायाविरोधात आवाज उठविणारे आणि समाजात समतावादी विचार रुजविणारे प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान नेहमीच समाजमनाला भिडणारे ठरले आहे. विचारांची धार, वास्तवाची जाणीव आणि प्रेरणादायी मांडणी हे त्यांच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य मानले जाते.
या व्याख्यानातून विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक-युवती, माता-भगिनी तसेच सर्वसामान्य नागरिकांना वैचारिक बळ मिळणार असून प्रजासत्ताक दिनाच्या अर्थपूर्ण साजरीकरणाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास लोहारा व परिसरातील नागरिकांनी कुटुंबासह आवर्जून उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment