“रंगांतून संस्कारांची उजळणी”ग्रामविकास फाउंडेशनच्या चित्रकला स्पर्धेतून १२०० विद्यार्थ्यांचा "प्रतिभावंत" सन्मान...!


✍️ राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल

नांद्रा(ता.पाचोरा)ग्रामीण प्रतिनिधी:
ग्रामीण भागातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला दिशा मिळावी आणि संस्कारांची बीजे लहान वयातच रुजावीत, या उद्देशाने ग्रामविकास फाउंडेशनच्या वतीने नांद्रा येथील आप्पासाहेब पी.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
माजी सभापती नितीन तावडे यांच्या संकल्पनेतून व कै. कैलास रामकृष्ण तावडे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कुरंगी–बांबरुड गटातील कुरंगी, नांद्रा, माहेजी व बांबरुड परिसरातील इयत्ता पहिली ते दहावीच्या सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून ग्रामीण भागातील कलावंतांची ताकद दाखवून दिली.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी श्रीराम आश्रमचे मठाधिपती परमपूज्य १००८ डॉ. स्वामी विष्णुदासजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एकूण ३६ विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमात राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार प्राप्त पत्रकार प्रा. यशवंत पवार यांचा सन्मान करत ग्रामविकास फाउंडेशन व शाळेने पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेचा गौरव केला. स्वामीजी व मुख्याध्यापक एस. के. पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
आपल्या प्रभावी मार्गदर्शनपर भाषणात डॉ. स्वामी विष्णुदासजी महाराज यांनी कला, संस्कृती व चित्रकलेचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. अध्यात्मातील विविध रंगछटा उदाहरणांसह मांडत त्यांनी विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेकडे आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचा संदेश दिला.
तर नितीन दादा तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या क्षमतेला पूर्ण वाव देण्यासाठी भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उपस्थितीत सरपंच सुभाष अण्णा तावडे, उपसरपंच शिवाजी आप्पा तावडे, ग्रामपंचायत सदस्य किशोर खैरनार, शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. वाय. जी. पाटील, तसेच शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. के. पाटील यांनी केले, सूत्रसंचालन गजानन ठाकूर सर यांनी केले, तर कलाशिक्षक जोशी सर यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन एल. एम. पाटील सर यांनी केले.

 ही चित्रकला स्पर्धा केवळ बक्षीस वितरणापुरती मर्यादित न राहता, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिशा देणारी व संस्कारांची शिदोरी देणारी ठरली, हेच या उपक्रमाचे खरे यश म्हणावे लागेल.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद