प्रति सावखेडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहीरमनगर पाचोरा येथील भैरवनाथ मंदिरात आज महाप्रसादाचा उत्साहात सोहळा संपन्न.....!
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी:-
सालाबादाप्रमाणे भैरवनाथाची यात्रा म्हणजेच भैरवनाथाच्या नावाने प्रचलित तीर्थक्षेत्र सावखेडा येथे मोठ्या भक्तिभावाने यात्रा भरते. त्याच धर्तीवर प्रति सावखेडा म्हणून ओळख असलेल्या पाचोरा शहरातील बहीरमनगर येथील भैरवनाथ मंदिरातही परंपरेने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
कित्येक पिढ्यांपासून चालत आलेल्या या परंपरेनुसार दरवर्षी शेवटच्या रविवारी नवसाला पावणाऱ्या बहीरमनगर येथील भैरवनाथ मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडतो. या उपक्रमात येथील सर्व भक्त-भाविक गुण्यागोविंदाने, एकजुटीने सहभाग घेतात.
मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते हे बहीरमनगर परिसरातून तसेच इतर ठिकाणांहून देणग्या संकलित करून या उपक्रमाला हातभार लावतात. देणगीदार दानशूर भाविक मोठ्या मनाने व आनंदाने सहकार्य करतात. विशेष म्हणजे येथील युवा तरुण मित्रमंडळी तन-मन-धनाने महाप्रसादाच्या कार्यात झटून काम करतात.
तसेच भैरवनाथ मंदिर परिसरातील तरुणांच्या पुढाकारातून दर रविवारी भाविक भक्तांसाठी व बालगोपालांसाठी मसालेदार खिचडीचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा, भक्तीभाव व सेवाभाव अधिक दृढ होत असून सर्व स्तरांतून या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
या पवित्र उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व देणगीदारांचे, दानशूर भाविकांचे व कार्यकर्त्यांचे आयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment