बसस्थानकात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू; सखोल चौकशीची मागणी
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
चाळीसगाव | प्रतिनिधी
चाळीसगाव बसस्थानक परिसरात एस.टी. बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या १३ वर्षीय विद्यार्थिनीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः वडगाव लांबे येथील ग्रामस्थांनी या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे.
सदर विद्यार्थिनी ही बसस्थानक परिसरात घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झाली होती. घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
“अपघात नेमका कसा झाला? बसस्थानक परिसरातील वाहतूक नियोजन व सुरक्षेची जबाबदारी कोणाची? निष्काळजीपणा झाला का?” असे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बसस्थानक परिसरातील सुरक्षेअभावीच ही घटना घडल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट व्हावीत, दोषी व्यक्ती अथवा यंत्रणांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांकडून जोर धरत आहे.
एका निष्पाप विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान झालेला मृत्यू हा केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित न करता, प्रशासनाने याकडे गंभीरतेने पाहून सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी जनभावना व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment