ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात...-अनेक विभागात घाणींचे साम्राज्य...-रुग्णांचे आरोग्य धोक्यात...
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी:-
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढतच चालले असुन गोर गरिब रुग्णांना आपला जीव धोक्यात घालून याठिकाणी उपचार घेण्यासाठी यावे लागत आहे. या सर्व प्रकाराकडे आरोग्य प्रशासाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधुन नाराजीचा सूर येवू लागला आहे. केंद्रातर्फे ग्रामीण रुग्णालयांना वेळोवेळी लागणारी साहित्य पुरविले जातात. मात्र पाचोरा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक मशिनरी सह अनेक साहित्य हे सद्यस्थितीत धुळ खात पडलेले आहेत. यासोबतच प्रत्येक विभागात घाणीचे साम्राज्य असुन पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नसल्याने रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाचोरा शहर, पाचोरा तालुक्यातील गोर गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र याठिकाणी असलेला सुखसुविधांचा अभाव बघता रुग्णांना मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असुन पावसाळ्यात अनेक विभागात पाण्याची गळती लागत असते. अशाच परिस्थितीत कर्मचाऱ्यांना काम करावे लागते.
शवविच्छेदन कक्ष बनले भुतबंगला...
ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजुस शवविच्छेदन कक्ष असुन याठिकाणी मृतदेह घेवुन जातांना रुग्णवाहिका चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. ठिकठिकाणी वाढलेले झाडे, झुडपे, घाणीचे साम्राज्य यातुन वाट काढत शवविच्छेदन कक्षा पर्यंत जावे लागते. याठिकाणी प्रचंड प्रमाणात घाण असुन अशा परिस्थितीतच शवविच्छेदन केले जात असल्याने मृतदेहास मरणानंतर देखील मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. यासंदर्भात अनेक वेळा दिव्य मराठीने बातम्या प्रसिद्ध केलेल्या असल्यातरी यात कुठलीही सुधारणा होत नाही.
अनेक विभाग केवळ नावालाच...
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दैनंदिन सुमारे ३५० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र सकाळी ९ ते दुपारी १ यावेळत केवळ दोनच डाॅक्टर रुग्णांची तपासणी करतात. तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक यांची २४ आॅक्टोबर २०२४ रोजी पदोन्नती बदली झाली असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून कनिष्ठ लिपिक नसल्याने कार्यालयीन कामकाजाची केवळ एकाच कर्मचाऱ्यावर जबाबदारी ओढावली आहे. कागदोपत्री ओपीडीसाठी १८ डाॅक्टरांची नियुक्ती असुन प्रत्यक्षात मात्र ५ ते ६ डाॅक्टर नियमित सेवा देताना दिसुन येतात. एक्सरे विभागातील एक्सरे मशिन वारंवार नादुरुस्त असते. व तेथील कर्मचारी थेट सांगतात की, खाजगी रुग्णालयात जा..मशिन नादुरुस्त आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांची भटकंती...
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून आर. ओ. मशिन लावण्यात आले आहे. मात्र याठिकाणी पाणीच उपलब्ध नसल्याने रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
अनेक मशिनरी व साहित्य पडले आहेत धुळखात...
ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागामार्फत पंचकर्मा मशिन, नवजात बालकांना ठेवण्यासाठी काचेच्या पेटीत, ब्लड बॅंक फ्रिज, नविन कपाटे ही धुळखात पडलेली असुन अग्निशमन यंत्रणा देखील कार्यान्वित नाही.
Comments
Post a Comment