पवित्र पोर्टलवरून ४८६० क्रीडा शिक्षक पदभरतीला मंजुरी; राज्याच्या क्रीडा शिक्षणाला ऐतिहासिक बळ – शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे
(राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल)
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर केंद्रस्तरीय विशेष क्रीडा शिक्षक संवर्गातील ४८६० नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही पदभरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे यांनी दिली.
शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून सुदृढ, सक्षम व शिस्तबद्ध पिढी घडविणे तसेच राज्यातील क्रीडा क्षेत्राची गुणवत्ता उंचावणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील सर्व समूह साधन केंद्रांमध्ये प्रत्येकी एक क्रीडा शिक्षक पद मंजूर करण्यात आल्याने, लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण क्रीडा शिक्षणाचा थेट लाभ मिळणार आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रस्तरीय क्रीडा शिक्षक भरतीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. महासंघाच्या शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, मंत्रालयातील सचिव, शिक्षण आयुक्त तसेच विविध मंत्री, आमदार, खासदार यांची भेट घेऊन वेळोवेळी निवेदने सादर केली होती. तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडेही मागणी लावून धरली होती.
या सातत्यपूर्ण आणि संघटित पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, शासनाने ४८६० क्रीडा शिक्षक पदांना मंजुरी दिल्याने महासंघाच्या दीर्घकालीन मागणीला अधिकृत मान्यता मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा निर्णय म्हणजे शारीरिक शिक्षकांच्या सकारात्मक संघर्षाचे आणि एकजुटीचे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व नैतिक विकास साधण्यासाठी क्रीडा शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून, माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सक्षम नेतृत्वाखाली तसेच शालेय शिक्षण मंत्री मा. दादासाहेब भुसे यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे हा बहुप्रतीक्षित निर्णय प्रत्यक्षात येऊ शकला, असे महासंघाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन, पारदर्शक व मेरिट-आधारित पद्धतीने पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येणार असल्याने पात्र उमेदवारांना न्याय मिळणार असून भरती प्रक्रियेतील विश्वासार्हता अधिक बळकट होणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण विभागाचे सचिव, शिक्षण आयुक्त तसेच संबंधित सर्व यंत्रणांचे महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, संपूर्ण शारीरिक शिक्षक परिवार व विविध संघटनांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहेत. भविष्यातही क्रीडा शिक्षणाच्या बळकटीसाठी शासन असेच सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment