नायलॉन मांजा विरोधात पाचोरा नगरपरिषदेची निर्णायक कारवाई ‘माझी वसुंधरा 6.0’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण 2026’ अंतर्गत व्यापक जनजागृती मोहीम
पाचोरा | प्रतिनिधी
माझी वसुंधरा अभियान 6.0 तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2026 च्या अनुषंगाने पाचोरा नगरपरिषदेतर्फे शहरात नायलॉन मांजा बंदीबाबत सविस्तर व प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. पर्यावरण संरक्षण, पक्षी संवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे.
या मोहिमेचे नेतृत्व मा. नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोरआप्पा पाटील, मा. उपनगराध्यक्ष श्री. किशोर गुणवंत बारावकर व मा. मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मोहिमेदरम्यान शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा व वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांशी थेट संवाद साधत नायलॉन मांजामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची सखोल माहिती देण्यात आली.
नायलॉन मांजामुळे पक्ष्यांचे पंख कापले जाणे, अनेक पक्षी गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडणे, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना अपघात होणे तसेच पर्यावरणाचे दीर्घकालीन नुकसान होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यामुळे नायलॉन मांजाचा वापर हा कायद्याने गुन्हा असून तो पूर्णतः टाळणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने ठासून सांगण्यात आले.
नागरिकांना पर्यावरणपूरक व सुरक्षित पर्याय स्वीकारण्याचे आवाहन करत “सण आनंदाचे असावेत, जीवघेणे नव्हेत” असा संदेश देण्यात आला. शहर स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणस्नेही ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या विशेष जनजागृती मोहिमेत पाचोरा नगरपरिषदचे स्वच्छता निरीक्षक श्री. संजय गोयर, शहर समन्वयक श्री. निखिल पाटील तसेच स्वच्छता विभागातील सर्व मुकादम व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रशासन व कर्मचारी वर्गाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही मोहीम प्रभावी ठरली.
नायलॉन मांजाविरोधात प्रशासनाने भविष्यातही कडक पावले उचलण्याचा इशारा देत नागरिकांनी स्वयंप्रेरणेने नायलॉन मांजाचा वापर टाळावा व पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
🌿 स्वच्छ पाचोरा, सुंदर पाचोरा 🌿
— पाचोरा नगरपरिषद, पाचोरा
Comments
Post a Comment