आदर्श इंग्लिश स्कूल दुर्घटना : प्रशासन जागे झाले, पण निष्पाप जीव परत येणार का? चौकशी, अटक आणि फरारी; शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
आदर्श इंग्लिश स्कूलमधील चिमुकले विद्यार्थी अंश व मयंक यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. या घटनेनंतर उशिरा का होईना, पण प्रशासन आणि यंत्रणा हालचालीत आली असून जळगाव जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी मीनल करणवाल यांनी स्वतः शाळेत भेट देत चौकशी केली. घटनेची शहानिशा करून अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या प्रकरणी भडगाव पोलिसांनी काल संस्था चालक व संबंधितांवर गुन्हा दाखल करत संचालक, प्राचार्या व वर्गशिक्षकांसह सहा जणांना अटक केली. आज भडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. जळगाव सब-जेलमध्ये जागा नसल्याने त्यांची नंदुरबार सब-जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेले आरोपी —
दिपक संभाजी महाजन, रमेश एकनाथ महाजन, रविंद्र एकनाथ महाजन, मनोज कौतिक महाजन, विनोद शिवराम महाजन (सर्व रा. भडगाव) तसेच महिला आरोपी सोनिया भादू वंजारी (रा. पळासखेडे) आहेत. मात्र, या गुन्ह्यातील ८ ते १० आरोपी अद्याप फरार असल्याची गंभीर बाब पोलिसांनीच मान्य केली आहे.
या संपूर्ण प्रकरणात केवळ कारवाई पुरेशी नाही, तर शाळांच्या सुरक्षिततेचा, निष्काळजी व्यवस्थापनाचा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा जाब घेणे तितकेच गरजेचे आहे. नियम, परवानग्या आणि तपास केवळ कागदापुरते मर्यादित राहिले तर असे बळी थांबणार कसे, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
दोषींवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा असली, तरी निष्पाप अंश व मयंक यांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी कोण घेणार?
हा सवाल शिक्षण व्यवस्थेसमोर आज उभा आहे.
✍️ राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
Comments
Post a Comment