“पाणी हीच खरी सेवा” : सावखेडा काळभैरव यात्रेतील १६ वर्षांची निस्वार्थ जलसेवा



“पाणी हीच खरी सेवा” : सावखेडा काळभैरव यात्रेतील १६ वर्षांची निस्वार्थ जलसेवा
श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांचा संगम असलेल्या सावखेडा (ता. पाचोरा) येथील काळभैरव यात्रेला दरवर्षी लाखो भाविकांची उपस्थिती लाभते. जळगाव, धुळे, संभाजीनगर, बुलढाणा यांसह अनेक जिल्ह्यांतून भक्त काळभैरवाच्या दर्शनासाठी येतात. मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात या अढळ श्रद्धेतून भाविक दर्शनानंतर वरण-भात, बट्टी, वांग्याची भाजी तसेच कबूल केलेल्या वजनाइतका गूळ देवाला अर्पण करतात. श्रद्धेच्या या प्रवाहात मात्र अनेक वर्षे एक महत्त्वाची उणीव जाणवत होती—ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची ठोस व्यवस्था.
याच गरजेची जाणीव ठेवून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने, शिवश्री दीपक हरी पाटील यांच्या आर्थिक सहकार्याने सुरू करण्यात आलेली शुद्ध पिण्याच्या पाण्याची (Aquwa) जलसेवा गेली सोळा वर्षे अखंडपणे भाविकांची तहान भागवत आहे. कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीपासून दूर राहून उभारलेला हा पाणपोळीचा मंडप आज यात्रेतील एक विश्वासाचे केंद्र बनला आहे.
कडाक्याच्या उन्हात, प्रचंड गर्दीत आणि सतत चालणाऱ्या दर्शन रांगांमध्ये ही जलसेवा भाविकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरते. थकलेले वृद्ध, लहान मुले, महिला आणि दूरवरून आलेले भक्त या सेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेताना दिसतात. “देव तुमचं भलं करो” असे शब्द आणि डोक्यावर ठेवलेले आशीर्वाद हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याचे जाणवते.
मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष शिवश्री दीपक हरी पाटील हे या उपक्रमामागील प्रेरणास्थान आहेत. समाजकार्य हे केवळ भाषणातून नव्हे, तर अशा प्रत्यक्ष सेवेतूनच प्रभावी ठरते, हे त्यांनी या जलसेवेतून सिद्ध केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते यात्रेच्या संपूर्ण कालावधीत अहोरात्र मेहनत घेताना दिसतात. गर्दीतून वाट काढत तहानलेल्या भाविकांपर्यंत पाणी पोहोचवणे, कुणालाही गैरसोय होऊ न देणे, हीच त्यांची सेवा आहे.
या उपक्रमासाठी भैरवनाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन पाटील, सचिव सुनील परदेशी, ट्रस्ट सदस्य प्रकाश परदेशी, पदम परदेशी, प्रकाश पाटील, संजय सोनवणे, देवीलाल परदेशी यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र सुखदेव पाटील, पोलिस नाईक दीपक पाटील, पोलिस कर्मचारी शाम हटकर, व्यापारी नितीन चौधरी, माणिक पाटील, संतोष पाटील, उद्योजक समर्थ दीपक पाटील, राका जी आदींचे मोलाचे सहकार्य लाभते.
लाखो भाविकांच्या गर्दीत कुणी ओळखीचा नसताना, कोणताही स्वार्थ न ठेवता दिले जाणारे पाणी हे माणुसकीचे सर्वोच्च दर्शन घडवते. पाण्याच्या एका घोटातून मिळणारा दिलासा, थकलेल्या देहाला मिळणारी ऊर्जा आणि मनाला मिळणारे समाधान हेच या सेवेचे खरे मोल आहे.
सावखेडा काळभैरव यात्रेत उभारलेली ही जलसेवा आज केवळ एक उपक्रम न राहता पाचोरा तालुक्याच्या सामाजिक जाणीवेचे प्रतीक बनली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद