बदरखेत महिलांच्या स्वावलंबनाकडे ठोस पाऊल...!उद्योजकता अभियानातून ग्रामीण महिलांना नवी दिशा
संपादक : राजेंद्र खैरनार, सत्य शोध न्युज चॅनल
नगरदेवळा | ग्रामीण महिलांचे श्रम, कौशल्य आणि इच्छाशक्ती यांना योग्य दिशा मिळाल्यास त्या स्वतःचे भविष्य घडवू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारा उपक्रम मौजे बदरखे (ता. पाचोरा) येथे पार पडला. जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय अध्यक्षा सौ. अभिलाषा रोकडे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी उद्योजकता अभियान व प्रशिक्षण शिबिराचे प्रभावी आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील महिलांचा लक्षणीय व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ग्रामीण भागातील महिला आजही अनेक संधींपासून वंचित राहतात. ही दरी कमी करण्याच्या दृष्टीने आयोजित या शिबिरात महिलांना गृह उद्योग, स्वयंरोजगार, प्रक्रिया उद्योग, बचत गट आधारित व्यवसाय यांसह विविध व्यवसाय संधींची सविस्तर माहिती देण्यात आली. शासकीय योजना, अनुदान, सबसिडी, बँक कर्ज प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करत महिलांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमात सौ. अभिलाषा रोकडे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले तसेच सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये ‘आपणही काहीतरी करू शकतो’ हा विश्वास दृढ झाल्याची भावना अनेक महिलांनी व्यक्त केली.
शिबिरात तुषार पाटील, वैभव शिंदे, विनोद पाटील, लक्ष्मी मराठे व शैलेंद्र बोरसे यांनी मार्गदर्शन करताना ग्रामीण महिलांनी उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून लघुउद्योग कसे सुरू करावेत, व्यवसायासाठी आवश्यक नोंदणी, परवानग्या तसेच बाजारपेठेची उपलब्धता यावर सखोल प्रकाश टाकला.
महिलांचे आर्थिक स्वावलंबन म्हणजेच कुटुंब, समाज आणि गावाच्या प्रगतीची मजबूत पायाभरणी होय. बदरखे येथे पार पडलेले हे उद्योजकता अभियान केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता ग्रामीण महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याची नांदी ठरेल, असा ठाम विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment