नगरदेवळा एमआयडीसीला गती; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूरात महत्त्वाची बैठक...!



(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल)

भडगाव, ता. ९ : नगरदेवळा सुतगिरणीजवळ मंजूर झालेल्या एमआयडीसी प्रकल्पातील प्रलंबित कामांना वेग देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली १० डिसेंबर रोजी दुपारी सव्वा चार वाजता नागपूर येथे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
या बैठकीची मागणी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी लेखी स्वरूपात मंत्र्यांकडे केली होती. मंत्र्यांनी त्याची तत्काळ दखल घेत बैठक निश्चित केली आहे.

अडीचशे एकरावर उभारणार औद्योगिक वसाहत

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नगरदेवळा येथे सुमारे २५० एकरांवर एमआयडीसी मंजूर झाली आहे. जागा आरक्षित करून प्लॉटिंगचे काम पूर्ण झाले असून, पुढील टप्प्यात उद्योगांसाठी आवश्यक मूलभूत पायाभूत सुविधा उभारणे अत्यावश्यक आहे. या सुविधांबाबत निर्णय घेण्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीस एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून, त्यातून प्रकल्पाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पाठिंब्याचा परिणाम

नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाचोऱ्यातील प्रचारसभेला आले होते. त्याच वेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून नगरदेवळा एमआयडीसीसाठी आवश्यक सुविधा आणि उद्योग उभारणीसाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना केल्या होत्या. या पाठिंब्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून आता एमआयडीसी प्रक्रियेला गती मिळत आहे.



प्रतिक्रिया — आमदार किशोरआप्पा पाटील

“पाचोरा-भडगाव तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, हा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. नगरदेवळा एमआयडीसीमध्ये आवश्यक सुविधा उभ्या राहिल्यास उद्योग येतील आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. नागपूरातील ही बैठक त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.”
— किशोरआप्पा पाटील, आमदार (पाचोरा-भडगाव)

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद