वादळी पावसातही कार्यरत तिन्ही यंत्रणांचा पाचोऱ्यात पत्रकार बांधवांकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न होणार...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा- गेल्या दोन दिवसा पुर्वी पाचोरा शहर व तालुक्यात अवकाळी वादळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वीज चमक, गडगडाट, तुफानी वारे आणि अवकाळी पावसाच्या जोरदार हल्ल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. शेतकऱ्यांचे,व्यापारी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, रस्ते पाण्याने भरले, झाडे व विजेचे खांब कोसळले, घरांमध्ये पाणी शिरले आणि अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. या संकटकाळात लोकांच्या मदतीसाठी धावून आलेल्या तीन प्रमुख यंत्रणा म्हणजे महसूल विभाग, वीज वितरण कंपनी आणि नगरपालिका प्रशासन या तिन्ही विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 24 तास अक्षरशः युद्धपातळीवर काम करत नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी झटून प्रयत्न केले आहेत.
या तिन्ही यंत्रणांनी पावसामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता झोप, आराम आणि वेळ याला विसरून आपापल्या कार्यक्षेत्रात रात्रीचा दिवस करत सेवा दिली व देत आहे त्यांची ही सेवा आणि समर्पण पाहून पाचोऱ्यातील पत्रकार बांधवांनी या सर्व यंत्रणांच्या वर्ग एक ते चार पर्यंतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, दि. १६ जून रोजी सकाळी ११.३० वाजता सर्व पत्रकार बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात हॉटेल नीलम जवळ एकत्रित येऊन प्रत्येक कार्यालयात जाणार आहेत या ठिकाणी वर्ग 1अधिकारी ते वर्ग 4 कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या अवकाळी संकटात महसूल विभागाचे प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, आपत्ती व्यवस्थापन पथक, कोतवाल, पटवारी यांनी रात्रंदिवस गावागावात जाऊन पंचनामे सुरू केले. पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या. शासकीय मदत लवकरात लवकर मिळावी म्हणून अहवाल तयार करण्याची प्रक्रिया झपाट्याने सुरू केली. कुठे शेतजमिनीत पाणी साचले होते, कुठे जनावरे वाहून गेली होती, कुठे अंगणातील भिंत कोसळली होती अशा प्रत्येक ठिकाणी महसूल यंत्रणा तत्काळ पोहोचत होती.
विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अतिशय धाडसाने काम करत विजेची तातडीने दुरुस्ती केली. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले, तारा तुटल्या, ट्रान्सफॉर्मर निकामी झाले. काही ठिकाणी खांबांवर झाडे कोसळली होती. अशा ठिकाणी अगदी प्रचंड धोका असतानाही वीज कामगारांनी जीव धोक्यात घालून कामे पूर्ण केली आणि नागरिकांचा वीजपुरवठा सुरळीत केला. त्यासाठी 24 तास काम केले, झोप न घेता फक्त एक कप चहा घेऊन वीज जोडण्याची जबाबदारी निभावली.
नगरपालिकेच्या सफाई, बांधकाम, जलपुरवठा आणि आरोग्य विभागांनीदेखील आपल्या जबाबदाऱ्या लिलया पार पाडल्या. रस्त्यावरील पाणी काढणे, गटारे मोकळी करणे, झाडांची फांदी हटवणे, पाणी शिरलेल्या घरांमध्ये मदत करणे, दवंडी देणे, रोगराई टाळण्यासाठी कीटकनाशके फवारणी करणे, अशा अनेक जबाबदाऱ्या या विभागाने यशस्वीरित्या पार पाडल्या
या तिन्ही यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून कामे केली. महसूल विभागाने प्राप्त अहवाल व तक्रारी त्वरित संबंधित विभागांपर्यंत पोहोचवल्या. वीज वितरण कंपनीने नगरपालिकेसोबत मिळून बाधित भागांतील वीजप्रवाह पुनर्संचयित केला. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघड्यावर पडलेल्या वायरपासून नागरिकांना वाचवण्यासाठी तात्पुरती कुंपण घातली.या तिन्ही विभागांच्या कार्यप्रणालीमुळेच जनतेचा त्रास लवकर कमी झाला. अन्यथा, या संकटाने मोठे विकोप घेतले असते. त्यामुळेच पाचोऱ्यात सर्व स्तरातून या तिन्ही यंत्रणांच्या कार्यशैलीचे कौतुक होत आहे.
या युद्धपातळीवरील सेवेला सलाम करत पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी फक्त विरोधात बातम्या लावणे म्हणजे पत्रकारिता नाही तर एक आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, १६ जून रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित सत्कार सोहळ्यात महसूल विभाग, वीज वितरण कंपनी व नगरपालिका प्रशासनातील वर्ग १ ते वर्ग ४ च्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात प्रत्येक प्रतिनिधीला सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, सहाय्यक अभियंते, शाखाधिकारी, अभियंते, तलाठी, वीज लाइनमन, सफाई कामगार, वाहनचालक, कार्यालयीन सहाय्यक अशा विविध पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.स्थानिक पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत. या कार्यक्रमातून केवळ सत्कार नव्हे, तर समाजाच्या सेवेसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक सकारात्मक प्रेरणा मिळेल, असा विश्वास पाचोरा पत्रकार बांधवांनी व्यक्त केला आहे.
आपत्तीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. समाजात अनेकदा प्रशासनावर टीका केली जाते, पण संकटाच्या वेळी झोकून देऊन काम करणारे हात किती महत्त्वाचे असतात हे अशा काळात लक्षात येते. त्यामुळेच पाचोऱ्यातील पत्रकार बांधवांनी हा उपक्रम हाती घेतला असून, समाजाने अशा सेवाभावी कर्मचाऱ्यांचा सन्मान करावा हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.
या सत्काराच्या निमित्ताने प्रशासन आणि सामान्य जनतेमधील सकारात्मक संबंध अधिक दृढ होतील आणि पुढील काळात आणखी कार्यक्षम सेवा मिळण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पाचोरा शहरातील व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी सोमवार दिनांक 16 जून सोमवार रोजी सकाळी 11-30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक नीलम हॉटेल जवळ एकत्रित जमावे ही विनंती
Comments
Post a Comment