जमिनीत रुजून आभाळाला गवसणी घालणारा माणूस!!


भडगाव प्रतिनिधी 
    डोक्यावर ओझं घेऊन स्टॅंडवर उभा असलेल्या सर्वसामान्य चेहऱ्याच्या, रापलेल्या वर्णाच्या एका माणसाचा फोटो सोशल मीडियावर बघायला मिळाला, तुम्ही म्हणाल यात काय विशेष?? सर्वसामान्य माणसाचं जीवन असच तर असतं!! पण थांबा... मत व्यक्त करायची घाई करण्याआधी थोडं गुगल सर्च करून बघा.. की वर्ड वापरा... 'चैत्राम पवार'!!
   लाखो मोटिवेशन स्टोरीज ज्याच्या कर्तृत्वापुढे फिक्या पडतील असे 'पद्मश्री चैत्राम पवार'!! या पद्मश्री विजेत्याची सत्यकथा सुरू होते धुळे जिल्ह्यातील 'बारीपाडा' या अतिदुष्काळी गावतून... गाव म्हणावं तर गावात वस्ती कायम स्वरूपी नाही, पाण्याची वानवा, रोजगार नाही, शिक्षण नाही, सततचे शोषण या दुष्टचक्रात अडकेलला कोकणा भिल्ल या आदिवासी समाजाची ही कथा.  असह्य परिस्थिती, साधारण पाऊस थांबला की ऊसतोडणी किंवा मिळेल ते काम करत पिढ्यानपिढ्या फक्त 'जिवंत' राहण्यासाठी केलेला संघर्ष, पोटाची भ्रांत त्यात शिकणार कुठून? गावात तर शाळा सुद्धा नव्हती!! 
    या सगळ्या परिस्थितीवर मात करणारा तारणहार या ठिकाणी जन्माला आला... चैत्राम पवार!! खडतर परिस्थितीत एम. कॉम. होऊन स्वतः पूरती नोकरी आणि स्वतःपुरते स्थिर जीवन नाकारून हा माणूस जवळपासचं जंगल वाचवयाचं मनावर घेतो आणि तब्बल तीस वर्षे त्यावर ठामपणे काम करत राहतो. गावकऱ्यांच्या मदतीने चक्क अकराशे एकर जंगल उभं करतो, 445 प्रकारच्या भाज्या /रानभाज्या पिकवतो. केवळ एवढ्यावरच न थांबता आपल्या बांधवांसाठी हा माणूस तब्बल 485 बंधाऱ्यांच्या माध्यमातुन गाव हिरवंगार करतो, गावातील विस्थापन थांबत, लोक शेती करू लागतात. गावात शाळा सुरू होते, मुलं शिक्षणाची कास धरतात!! चमत्कार म्हणावा असं काम या जमिनीशी नाळ जोडलेल्या माणसाने केलं आहे.
तरीही त्यांना प्रसिद्धी न मिळण्याची दोन कारणं दिसतात, पाहिलं म्हणजे यावेळच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत अशोक सराफ, चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनाकार अच्युत पालव अशी नावाजलेली मंडळी आहेत, ज्यात चैत्राम पवार यांचं नाव फारसं कुणी ऐकलेलं नाही. दुसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आदिवासी तरुणांना भडकाऊन त्यांना नक्षल चळवळीकडे ओढण्याऐवजी विधायक काम करणारे, 'आदिवासी की वनवासी' अशा फालतू वादात न पडणारे आणि मुख्य म्हणजे हे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या 'वनवासी कल्याण आश्रम' या संस्थेच्या माध्यमातून तडीस नेणाऱ्या चैत्राम पवार यांवर 'डाव्या' मीडियाने अघोषित बंदी घातल्यासारख्या त्रोटक बातम्या दिल्या, त्यांचं कौतुक सुद्धा केलं नाही.
अशी माणसं प्रसिद्धी पलीकडे असतात, त्यांच्या कामावर या सगळ्याचा परिणाम होत नाही. म्हणूनच साध्या नगरसेवकाच्या मुलाकडे फॉर्च्युनर गाडी असण्याच्या दिवसात पद्म पुरस्कार मिळाल्यावरही हा माणूस डोक्यावर ओझं घेऊन एसटीतुन ताठ मानेने प्रवास करतोय. 
    मातीत भक्कम पाय रोवून उभी असलेली तरीही आभाळाला गवसणी घालणारी चैत्राम पवार यांच्यासारखी माणसं सद्यस्थितीत आपला आयडॉल असण्याची गरज आहे.


Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद