ए.टी.एम. बंद मुळे शेतक-यांसह सामान्य नागरीक त्रस्त,पत्रकार तात्काळ सुरू करण्यासाठी आंदोलनाच्या मार्गावर...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
आजच्या प्रगत युगात सगळीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून आर्थिक व्यवहारात ए. टी. एम. हे महत्त्वाचे साधन मानले जात आहे. कारण आजच्या परिस्थितीत वाढत्या चोऱ्या, लुटमार, खिसे कापणारांची संख्या वाढल्याने यापासून बचाव करण्यासाठी सोपा आणि साधा उपाय म्हणजे खिशात पैसा न बाळगता पाहिजे तिथे, पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध करुन देणारे साधन म्हणजे ए. टी. एम. म्हणून आजच्या परिस्थितीत धनदांडग्या पासून तर सर्वसामान्य नागरिक आता ए. टी. एम. चा वापर करायला लागले आहेत.
असे असले तरी हे ए. टी. एम. स्वयंचलित यंत्र असल्याने कधी, कधी तांत्रिक बिघाड होतात. परंतु असे बिघाड झाल्यास संबंधित बॅंकानी तातडीने ए. टी. एम. मशिनची दुरुस्ती करणे वेळेवर पैसे भरणे इत्यादी गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र पाचोरा शहरासह ग्रामीण भागातील ज्या, ज्या ठिकाणी ए. टी. एम. मशीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे त्या पैकी काही ठिकाणचे ए. टी. एम. मशिन बऱ्याचशा दिवसांपासून बंद पडले आहेत.
यामुळे ए. टी. एम. चा वापर करणाऱ्या सर्वच नागरिकांना मोठी अडचण निर्माण होऊन आर्थिक व्यवहार थांबले आहेत. यामुळे ऐनवेळी हातात पैसा नसल्याने दवाखाना, औषधोपचार, शालेय शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, महत्त्वाचे म्हणजे मोजकेच पैसे घेऊन निघालेल्या व्यक्तीला घराकडे परत जाण्यासाठी लागणारे बसभाडे किंवा स्वताचे वाहन असेल तर त्यासाठी इंधन घेतांना अडचणीचे ठरत असून आहे.
तसेच आता पावसाळा सुरु झाला असून शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके, शेती उपयोगी अवजारे, बैलजोडी व साधनसामग्री घेण्यासाठी व शेताची मशागत करण्यासाठी पैशाची अत्यंत गरज आहे. परंतु ए. टी. एम. मशिन सतत बंद रहात असल्याने ‘ए. टी. एम. मशिन बंदमुळे जीवाला घोर, पैसे असुन झाले चोर’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या उमेदीने घरातून निघालेल्या ए. टी. एम. धारकाला निराश होऊन चोरा सारखे घरी परतावे लागत आहे.
म्हणून या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी आता पाचोरा पत्रकारांनी दंड थोपटले असून बॅंकेच्या वातानुकूलित कॅबिन मध्ये बसून झोपा काढणाऱ्या बॅंकेच्या व्यवस्थापकांना जागे करण्यासाठी काटेरी गुलाबपुष्प देऊन सत्कार करणार असल्याचे ठरवण्यात आले असून याकरिता पाचोरा पत्रकार आज दिनांक २९ में २०२५ गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन प्रथम श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन नंतर मा. प्रांताधिकारी आणि पाचोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.किशोर आप्पा पाटील यांना निवेदन देऊन ए. टी. एम. मशिन तात्काळ रिपेअर करुन ते कायमस्वरुपी सुरु करण्याची मागणी करणार आहेत.
या अनोख्या शांततामय पद्धतीने आंदोलन करुनही जर ए.टी.एम. मशिन सात दिवसाच्या आत तात्काळ रिपेअर करुन ते नित्यस्वरुपी चालू करण्यात आले नाही तर आठ दिवसानंतर ढोल-ताशांच्या गजरात पुन्हा आंदोलन करुन बॅंकेच्या व्यवस्थापकांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन ए. टी. एम. सेवा त्वरित सुरु करण्याची मागणी केली जाणार आहे.
Comments
Post a Comment