जेसीबी जप्तीचा थरार; पाचोरा महसूल विभागाची दबंग कारवाईचे जनतेत कौतुक, वाळू माफियांमध्ये धडकी...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दिनांक 13/03/2025
मौजे पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु प्र पा गावात दिनांक 11/03/2025 दुपारी 11 वाजता नदीत JCB उतरत असल्याची माहिती प्राप्त होताच अवैध गौणखनिज वाहतूक प्रतिबंध पथक घटनास्थळी पोहोचले. सदर ठिकाणी JCB आणि ट्रॅक्टर पाण्यातून नदीच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पळाले. त्यावेळेस ग्राम महसूल अधिकारी ललित पाटील यांनी JCB पाण्यातुन पळत असताना JCB वर चढून सदरील जेसीबी पकडला. JCB पाण्यातून पळून जात असताना खडकावर आदळून बंद पडला होता. त्या मधून ऑइल सांडत होते. सदर वाहनावरील चालक व मालक हा दुर्गेश भाऊसाहेब पाटील रा. अंतुर्ली खु असल्याचे निष्पन्न झाले. त्याने सदर वाहन तहसिल कार्यालयात नेण्यास नकार देत माझे वाहन हे तुम्ही कसे नेता हेच मी पाहतो असे म्हणत शासकीय कामात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून पथकाला बाहेरुन मदत मिळविणे आवश्यक असल्याने साधारण 2-3 JCB पाचोरा येथुन मागविण्यात आले. परंतु त्याला अंतुर्ली गावातून वाळू वाल्यानी धमकी देऊन परत पाठविले. मग शेवटी दुसरे JCB खडकदेवळा ता. पाचोरा येथुन मागविले व नादुरुस्त JCB ला पाण्यातुन बाहेर काढण्यात यश मिळाले. परंतु ऑईल टँक फुटल्यामुळे सदरील मशिन चालु होऊन देखील जागेवरुन हलले नाही. म्हणून रात्री 10 वाजता असा निर्णय घेण्यात आला की मंडळ अधिकारी वरखेडी श्री. महेंद्र पाटील यांचे पथक रात्रपाळी करत याच ठिकाणी थांबेल व सकाळी कारागिर आणुन मशिन दुरुस्त करुन पाचोरा तहसिल कार्यालयात जमा करण्यात येईल.
दिनांक 12/03/2025 रोजी सकाळी 08:00 वाजता ग्राम महसूल अधिकारी ललित पाटील यांनी चार्ज घेतल्यावर त्यांचे असे लक्षात आले की, चोरटयांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत JCB ची बॅटरी, ऑईल, डिझेल चोरुन नेले व बरेचसे वायर व नळ्या तोडुन टाकल्या जेणेकरुन सदर मशिन महसूल पथकाला ताब्यात घेऊन जमा करण्यात येणार नाही. सर्व परिस्थीती तहसिलदार पाचोरा श्री. विजय बनसोडे यांना सांगितल्यांनतर सदर मशिन दुरुस्त करणे शक्य नसल्याने त्याला क्रेन च्या सहाय्याने उचलुन आणणे अधिक सोयीस्कर असल्याचे निदर्शनास आल्यावरुन कजगाव येथील समाधान कोळी यांचे मालकीचे क्रेन मागवुन त्याला लोडर मध्ये आणुन तहसिल कार्यालय, पाचोरा च्या आवारात जमा करुन सदर अवैध गौणखनिज उत्खननात वापरण्यात आलेले जेसीबी कंपनीचे एक्सकॅव्हेटर क्रमांक MH 19 EA 2201 (चेसीस क्रमांक 1363886C2008) श्री. दुर्गेश भाऊसाहेब पाटील रा. अंतुर्ली खु ता. पाचोरा यांचे मालकीचे / ताब्यात असलेले वर पंचनामा करुन पुढील दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित आहे.
सदर कार्यवाहीत मंडळ अधिकारी पाचोरा श्री. आर.डी. पाटील, मंडळ अधिकारी वरखेडी श्री. महेंद्र पाटील, मंडळ अधिकारी नगरदेवळा श्री. विजय येवले, मंडळ अधिकारी शिंदाड श्रीमती कीर्ती चौधरी, ग्राम महसूल अधिकारी श्री. ललित पाटील, आशिष काकडे, तात्याराव सपकाळ, राहुल पवार, रामकृष्ण बळी, दीपक दवंगे व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बु, येथील पोलीस पाटील, कोतवाल व नागरीक यांचे योगदान लाभले.
स्वाक्षरीत/-
तहसिलदार पाचोरा
Comments
Post a Comment